भंडारा :- अवकाळी आलेल्या पावसाने धान पिकावर खोडकिडा आणि पेरवा रोगाचा प्रादुर्भाव झाला. मात्र याचे सर्वेक्षण झाले नव्हते किंवा शासनाला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अवगत केले गेले नव्हते. दरम्यान भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खा. सुनील मेंढे यांनी निवेदन देत वस्तुस्थिती समजावल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी भाषणात अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे सांगून दिलासा दिला आहे. त्यामुळे खासदारांच्या शिष्टाईला यश आले आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अवकाळी आलेल्या पावसाने धान पिकावर खोडकिडा आणि पेरवा रोगाचा प्रादुर्भाव झाला. विशेष करून पवनी आणि भंडारा तालुक्यातील शेतकरी अधिक प्रभावित झाले होते. या दोन्ही रोगामुळे झालेले नुकसान कोणत्याही पिक विम्याच्या कवचाखाली येत नसल्याने पिक विमा मिळणे अशक्य होते अशावेळी आधी खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हा प्रशासनाची दिनांक 16 नोव्हेंबर 2023 ला बैठक घेऊन कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताबडतोब नुकसानग्रस्त पिकाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या. त्यावेळेस त्यांनी विशेष बाब म्हणून अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान शासन आपल्यादारी कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भंडारा जिल्ह्यात आले होते. यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन देत या विषयाची वस्तुस्थिती समजावून सांगितली. पीक विम्याची कोणतीही मदत होणार नसल्याने शासन स्तरावर विशेष बाब म्हणून मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. धानाला बोनस द्यावा हा विषय ही त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात संबोधित करताना खोडकिडा आणि पेरवा रोगामुळे बाधित असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत दिली जाईल. त्यासाठी नियोजन करण्यात येईल. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही असा शब्द दिला. तर बोनस च्या बाबतीत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे बोनस देण्यासंदर्भात मागणी करतो असे ते बोलले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात हिवाळी अधिवेशनात बोनसचा निर्णय घेतलेला विषय सांगून, एक प्रकारे खासदारांच्या दुसऱ्या मागणी नाही दुसरा दिला.
हे दोन्ही विषय खासदार सुनील मेंढे यांनी शेतकरी हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे लावून झाले. त्यामुळे आज या अनुषंगाने सकारात्मक भूमिका शासनाकडून स्पष्ट करण्यात आली. परिणामी आता भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याला मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता ताबडतोब प्रशासनाची बैठक घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलून केलेले शिष्टाई कामात आल्याचे यामुळे स्पष्ट होते.