चंद्रपूर : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री असलेले ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणजेच मोठ्या हृदयाचे लोकनेते म्हणून लौकीक आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कामाचा आवाकाही त्यांच्या मनासारखाच मोठा आहे. त्यामुळे मंत्रीमंडळात एकत्र काम करताना त्यांच्याकडून रोज काही ना काही शिकायला मिळत असतं, या शब्दांत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावनांना वाट मोकळी करून दिली.
पालकमंत्री ना . सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत आढावा बैठक घेण्यता आली. नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या बैठकीत ना.बनसोडे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित देओल, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, हरीश शर्मा, राहुल पावडे, देवराव भोंगळे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी ना . बनसोडे म्हणाले की, राज्याचे अर्थमंत्री असताना ना. सुधीरभाऊंनी केलेले काम आजही स्मरणात आहे. सुधीरभाऊ चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळत आहे म्हटल्यावर या स्पर्धा निश्चितच देशपातळीवर यशस्वी होतील यात तीळमात्रही शंका नाही. विदर्भाएवढेच प्रेम सुधीरभाऊ मराठवाड्यावरही करतात, असा उल्लेख करीत बनसोडे म्हणाले की सुधीरभाऊ आमचे (मराठवाड्याचे) भाऊजी आहेत. त्यामुळे त्यांचे मराठवाड्यावर प्रेम असणारच. गमतीचा भाग सोडला तर खरच सुधीरभाऊ विदर्भाएवढाच मराठवाड्यासाठी देखील आवाज बुलंद करतात. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मराठवाड्याला दिला आहे. मराठा मुक्ती संग्रामच्या ७५ वर्षपूर्ती निमित्तानेही त्यांनी उल्लेखनीय प्रकल्पांसाठी भरीव मदत केली.
क्रीडा विद्यापीठासाठीही सुधीरभाऊंनी सुमारे सव्वा सहाशे कोटी रुपयांची मान्यता दिली. क्रीडा खात्याचा मंत्री म्हणून आपण त्यांचे यासाठी आभार मानतो, असेही. ना.बनसोडे म्हणाले. सुधीरभाऊंच्याच कार्यकाळात क्रीडा संकुलांना मिळणाऱ्या निधीमध्ये घसघशीत वाढ झाल्याचेही ते म्हणाले. सुधीरभाऊंच्या या पावलावर पाऊल ठेवत आता पुन्हा क्रीडा संकुलांच्या निधीत वाढ करण्यात आल्याचे क्रीडा मंत्र्यांनी सांगितले.
कॅबिनेटमध्ये भाऊंचाच आवाज
ना. सुधीरभाऊ यांचे राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात चांगलेच वजन आहे. भाऊ मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत असताना सर्वच मंत्री त्यांच्या विषयाला गांभीर्याने ऐकतात. त्यांच्या शब्दाला मंत्रिमंडळात मान दिला जातो, त्यामुळे क्रीडा विभागाच्या योजनांसाठीही मदत करावी, अशी आग्रहाची विनंती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केली.
बारामतीसारख्या सुविधा बल्लारपूरमध्ये
राज्यात क्रीडा सुविधांच्या बाबतीत आतापर्यंत बारामतीचे नाव घेतले जात होते. परंतु मी बल्लापूरच्या क्रीडा सुविधा पाहिल्या. आश्चर्य वाटले. आतापर्यंत बारामतीतच क्रीडा सुविधा आहेत असे बोलले जायचे परंतु आता या सुविधांच्या बाबतीत सुधीरभाऊंच्या बल्लारपूरने बारामतीलाही मागे टाकलेय असे ना.संजय बनसोडे म्हणाले.