भारत पेन्शनर्स सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत निर्णय
पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी -:ई पी एफ पेन्शन धारकांचे शासन दरबारी अनेक प्रश्न रखडलेले आहेत. यासंदर्भात अनेक आंदोलने झाली. शासनाला निवेदन ही दिले. परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.केंद्र शासनाने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा. दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा ई पी एफ पेन्शन धारकांनी दिला आहे.
दिल्ली येथील सत्यसाई सभागृहात भारत इन्शुरन्स सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत सेवानिवृत्त कर्मचारी १९९५ राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत पेन्शनर्स सोसायटीचे सचिव प्रकाश येंडे यांनी प्रशासनाला व सरकारला हा इशारा दिला. सप्टेंबर -२०१४ मध्ये किमान निवृत्ती वेतन एक हजार रुपये करण्यात आले. तेव्हापासून १ रुपयाची पण वाढ केलेली नाही. त्यामुळे पेन्शनधारकात असंतोष खदखदत आहे.
महागाईच्या या युगात सरकारने ७५ लाख पेन्शनधारकांना सन्मानजनक पेन्शन दिली तर त्यांचा सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल. त्यामुळे केंद्र शासनाने ४ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या संसद अधिवेशनात ई पी एफ पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये सन्मानजनक वाढ करावी. अन्यथा १२ डिसेंबर पासून जंतरमंतर वर आंदोलन सुरु करून आगामी निवडणुकीसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल असा इशारा दिला . या सभेत भारत पेन्शनर्स सोसायटीचे सचिव एस. सी. माहेश्वरी, ई पी एस पेन्शनर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पुंडलिक पांडे, भारत पेन्शनर्स सोसायटीचे सर्व पदाधिकारी व देशभरातील पेन्शनधारक उपस्थित होते.