वरोरा (आशिष घुमे ) :- महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंदनिकेतन कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी सत्कार समारंभाच्या प्रसंगी जेष्ठ समाज सेवक तथा संस्थेचे सचिव डॉ विकास आमटे यांनी कृषी महाविद्यालयातील माजी विदयार्थ्यांना संबोधित करीत असताना, आपण आनंदवनाचे ब्रँड अँबेसिडर असून आपण समाजात विविध क्षेत्रात वावरत असताना सामाजिक संवेदनशीलतेचा वारसा समाजात पुढे न्यावा असे प्रतिपादन दि.12 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या सत्कार समारंभात केले.
महाविद्यालयाच्या वतीने मागील तीन वर्षातील ज्या माजी विदयार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून संपादित केलेल्या यशाचे कौतुक करण्याकरिता आदरणीय डॉ .विकास आमटे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. नरेश मेश्राम केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर , डॉ. अभय शिराळे शास्त्रज्ञ एन बी एस एस नागपूर, डॉ. रवींद्रनाथ नैताम शास्त्रज्ञ, एन. बी. एस. एस.नागपूर , सुधाकर कडू , विश्वस्त आनंदवन उपस्थित होते तर मुख्य अतिथी म्हणून . पियुषा जगताप अवर संचालक वन अकादमी चंद्रपूर या उपस्थित होत्या . त्यांनी कृषी पदवीधरांनी कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर म्हणून निवड करीत असतांनाआपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करावा तसेच कृषीकन्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. माजी विद्यार्थी डॉ नरेश मेश्राम यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना अभ्यासाच्या बाबतीत काटेकोर नियोजन केल्यास कुठलाही विद्यार्थी मागे राहणार नाही याची ग्वाही दिली. तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.अभय शिराळे यांनी विद्यार्थ्यांना स्व उदाहरणावरून प्रेरित केले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना संस्थेचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी भविष्यात आपल्या कृतीतून नेहमी समाजातील अंतिम घटकांचा विचार व्हायला हवा हा बाबांचा विचार रुजविण्याची गरज बोलून दाखविली.
सत्कार समारंभाची सुरुवात महाविद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या अमृत महोत्सवी सत्काराने करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून अखिल भारतीय वन सेवेत स्थान प्राप्त करणाऱ्या प्रथमेश तिजारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच बँकिंग सेवा , राष्ट्रीय बियाणे महामंडळ , कृषी विभाग महाराष्ट्र राज्य , भारतीय खाद्य निगम, इफको , भारतीय जीवन विमा निगम या विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश संपादित करणाऱ्या 40 विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास पोतदार ,सूत्रसंचालन राहुल तायडे तर आभार प्रदर्शन राखी राखडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन स्पर्धा परीक्षा मंचचे महाविद्यालयीन प्रभारी डॉ सतीश इमडे यांच्या नेतृत्वात सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी यांच्या वतीने करण्यात आले होते .