(गोंडपिपरी) -सुरज माडुरवार :- गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या धाबा वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव जंगलातील कक्ष क्रमांक १६१ व १६३ मध्ये वाघिणीच्या बछड्याचा व वाघीनीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली. वन विभागाच्या वतीने गस्त घालताना बछड्याचा मृतदेह दि.(२४) शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आढळला. बछड्याचा मृतदेह चंद्रपूर येथे शव विच्छेदन करिता नेल्यानंतर लगेच आज परत जवळच असलेल्या कक्ष क्रमांक १६१ मधे अंदाजे ८ वर्षाच्या वाघिणीचा मृतदेह दि.(२५) शनिवारी सकाळी ८ च्या दरम्यान आढळल्याची धक्कादायक घटना घडली. वाघीनीचा मृत्यू १० दिवसापूर्वी झाल्याची प्राथमिक माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.रोज गस्तीवर असणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आपल्याच कक्षातील वाघिणीच्या मृतदेह १० दिवसापर्यंत कडला नाही यावरून कर्मचारी यांच्या कार्यप्रणालीवर तालुक्यात शंका व्यक्त केली जात आहे.
गोडपिंपरी तालुका हा वनसंपत्तीने नटलेला आहे.जंगलात वन्य प्राण्यांचा वावर आहे.वाघिणीचा
मृतदेह चाळीस ते पन्नास टक्के कुजलेल्या अवस्थेत सापडला. वाघिणीचा मृत्यू दहा ते पंधरा दिवसांपूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. घटनास्थळीच वाघीण कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करत अंत्यविधी करण्यात आला. वाघिणीच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात असून सर्पदंशाने किंवा वीज पडून मृत मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.घटनास्थळी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती होती.
वन विभागाचा निष्काळजीपणा…?
धाबा डोंगरगाव क्षेत्रात अधून मधून वाघ,अस्वल,बिबट यांचे दर्शन नागरिकांना होत असते.या वनपरिक्षेत्रात सागवणाचा मोठा साठा आहे.सागवान चोरीच्या अनेक घटना उघडकीस येत असतात.अशा स्थितीत वाघिणीचा मृतदेह तबल १० दिवसानंतर आढळत असल्याने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर वन्यप्रेमींकडून टिका केल्या जात आहे.वाघिणीचा मृतदेह घटनेनंतर लगेच आढळले असते तर शोधमोहिमेदरम्यान बछड्याचा शोध लागला असता व बछड्याचा उपाशी पोटी मृत्यू झाला नसता त्यामुळे कर्तव्यावर कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे