गडचिरोली:-मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका इसमाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.प्रवीण शंकर पेद्दीवार बजरंग चौक वॉर्ड क्रमांक 6 रा.आलापल्ली ता.अहेरी,जिल्हा गडचिरोली असे त्या इसमाचे नाव आहे.
प्रवीण शंकर पेद्दीवार हा 4 डिसेंबर पासून घरून बेपत्ता होता.5 डिसेंबर रोजीही सदर इसम घरी न आल्याने घरच्या लोकांनी आणि मित्रांनी आलापल्लीत विविध ठिकाणी शोधमोहीम राबविली. एवढेच नव्हेतर सदर व्यक्ती बेपत्ता असून आढळून आल्यास माहिती द्यावी असे पोस्ट सोशिअल मीडियावर व्हायरल केले. मात्र,आज 6 डिसेंबर रोजी मार्कंडेय मंदिर परिसरातील सार्वजनिक विहिरीत त्याचे मृतदेहच आढळून आला आहे.
सदर इसमाने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.याची माहिती मिळताच अहेरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मोका पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह अहेरी ग्रामीण रुग्णालयात पाठविले जाणार आहे.सदर इसम एसटी महामंडळच्या अहेरी आगाराच्या कार्यशाळेत कर्मचारी असल्याची माहिती आहे.त्याच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा आप्त परिवार होता.घरचा कमावता व्यक्ती गेल्याने दुःखाचे डोंगर कोसळले आहे.