मुलचेरा:-प्रत्येक व्यक्तीमध्ये एक उत्तम खेळाडू दडलेला असतो. त्यासाठी खेळाच्या माध्यमातून त्याच्या अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देणे गरजेचे असते, असे मत माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.
मुलचेरा तालुक्यातील कालीनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गांधीनगर येथील क्रिकेट स्पर्धचे उदघाटन नुकतेच राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले,याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी युवा नेते कुमार अवधेश बाबा,प्रवीणराव आत्राम,भाजपचे मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती, ग्रामपंचायत सदस्य बादल शहा, कालीनगरचे सरपंच पवन मंडल, बंगाली आघाडी महामंत्री बिधान वैद्य, पोलीस पाटील नागेन सेन, महामंत्री निखिल हलदार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संजीव सरकार, सनातन सरकार, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, मंचरलावार, नगरसेवक दिलीप आत्राम,अक्षय चुधरी, उमेश सरकार,अक्षय खिरटकार, गांधीनगर येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पुढे बोलताना ग्रामीण भागातील अनेक खेळ काळाच्या ओघात लोप पावत चालले आहेत. या खेळांना व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे. एवढेच नव्हेतर मुलांना लहानपणापासून एखाद्या खेळामध्ये रुची असल्यास पालकांनी त्याला प्रोत्साहित केले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाला महत्त्व आहेच, पण सुदृढ शरीर व कार्यक्षम मेंदू घडविण्यासाठी खेळ सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना केवळ अभ्यासाची सक्ती न करता, त्यांच्या अभिरुचीनुसार व आवडीनुसार एखाद्या खेळातील कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तरच भविष्यात देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करणारे खेळाडू तयार होतील.
गडचिरोली जिल्ह्यात उत्तम खेळाडू आहेत. मात्र, योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू पुढे जाताना दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे. क्रीडा क्षेत्रात युवा पिढीचे उज्वल भविष्य घडवायचे असेल तर त्यांच्यासाठी क्रीडांगण,मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज आहे.मात्र, आपल्या भागातील लोकप्रतिनिधी मध्ये इच्छाशक्ती नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.कठीण परिस्थितीतही विविध खेळांत सहभाग होणाऱ्या ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंच्या पाठीशी आपण सदैव उभं असून त्यांना आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही माजी राज्यमंत्री अम्ब्ररीशराव आत्राम यांनी दिली.