गडचिरोली:- 21 ऑक्टोबर हा दिवस भारतभर ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणून साजरा केला जातो. पोलीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त लाहेरी उपपोलीस स्टेशनच्या वतीने आदरांजली व्यक्त करून अभिवादन केल आहे.
देशभक्तीच्या भावनेसाठी बहुतेक भारतीय सैनिकांचे स्मरण केले जाते, पण देशातील पोलिसांसाठी खास दिवस लोकांना फारसा आठवत नाही. हा दिवस म्हणजे ‘पोलीस स्मृती दिन’ या दिनाला ‘पोलीस शहीद दिन’ असे देखील म्हणतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाची सेवा करताना शहीद झालेल्या देशातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. मात्र 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन साजरा करण्यामागे 1959 ची घटना आहे जी चीनशी संबंधित आहे.
21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्या दिवसापासून 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये यानिमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन करण्यात येते. यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते
याचेच औचित्य साधून उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद परिवारातील रुक्मिणी गणेश कोटा व शहीद पत्नी सगुना सहदेव पुंगाटी यांच्या हस्ते शहीद वीरांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रभारी अधिकारी महादेव भालेराव यांनी देशाच्या लोकशाही रक्षणार्थ अहोरात्र कर्तव्य करत असलेल्या पोलीस दलाबद्दल उपस्थितीताना माहिती देत जास्तीत जास्त युवक युवतींनी पोलीस दलात यावे असे आवाहन केले.यावेळी सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट स्वागत यांनी सुद्धा महाराष्ट्र पोलिसांचा दैदिप्यमान इतिहास विशद करत उपस्थितांना हुतात्मा दिनाचे महत्त्व समजून सांगितले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार पोलीस उपनिरीक्षक सचिन सरकटे, पाटील तसेच पोलीस हवालदार राजेंद्र भांडेकर, सखाराम शेडमाके, मपोशी रेशमा गेडा, रत्नमाला जुमनाके, चंदा गेडाम, वृषाली चव्हाण, प्रमिला तुलावी, सगुना पुंगाटी पोलीस शिपाई गुगलू तीम्मा, भूषण गलगट, कृष्णा, मस्के, मानकर दानी कुंबरे व एसआरपीएफ चे अंमलदार यांनी सहकार्य केले.
*काय घडलं होतं त्या दिवशी ?*
16 हजार फूट उंचावरील लडाखमधील हॉट स्प्रिंग परिसरामध्ये सीआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक करण सिंग यांच्या नेतृत्वाखाली 20 जवानांचे गस्त पथकावर दबा धरून असलेल्या चिनी सैनिकांनी गोळीबार केला. ज्यात भारताचे दहा जवान शहीद झाले. तर 07 भारतीय पोलिसांना बंदी बनवण्यात आले.या शहिदांचे मृतदेह 28 नोव्हेंबर 1959 रोजी भारताच्या ताब्यात दिल्यानंतर या शहिदांवर सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या देशातील सर्व शहीद पोलिसांचे स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पोलीस स्मृतिदिन साजरा केला जातो.