गडचिरोली:- जिल्ह्यात 7 आगस्ट पासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोर धरला असून आज 8 ऑगस्ट सकाळपासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गासह काही महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहे.
मागील जुलै महिन्यात गडचिरोली जिल्ह्याला पूर परिस्थितीचा सामना करावा लागला त्यात अहेरी उपविभागातील पाच तालुक्यांना खूप मोठा फटका बसला होता. गडचिरोलीतील ही दयनीय अवस्था बघता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी भेट देऊन जिल्हा मुख्यालयात आढावा घेतला.तर त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवार असे राज्यातील दिग्गज नेत्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आस्थेने विचारपूस करतानाच पूरपरिस्थितीची पाहणी करून योग्य मोबदला देण्याची मागणी केली आणि पूर परिस्थितीमुळे बेघर झालेल्या नागरिकांना वनविभागाची जमीन अधिग्रहण करून पुनर्वसित करण्याची मागणी केली होती.सध्या प्रशासनातर्फे पंचनामे सुरू असून अजूनपर्यंत येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळाली नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
जवळपास 8 जुलै ते 22 जुलै पर्यंत गडचिरोली जिल्हावासीयांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागला. हळूहळू ही परिस्थिती सावरत असताना पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या आठवडाभरात गडचिरोली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे शेतशिवारांमध्ये अंतर्गत मशागतीची कामे वेगात सुरू होती. ही कामे सुरू असताना पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे.
7 ऑगस्ट पासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सात जुलैच्या रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज 8 ऑगस्ट रोजी काही महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहे.त्यात चांदाळा-कुंभी, रानमुल-माळेमूल, पोटेगाव-देवापूर, साखरा-कारवाफा,मुलचेरा-आष्टी,आलापल्ली-भामरागड असे महत्वाच्या मार्गांचा समावेश आहे. अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाला आहे. त्यामुळे बरेच मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत हे विशेष.