गडचिरोली:- जिल्ह्यातील आष्टी ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 C वर असलेल्या खड्डड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून प्रवाशांचे हाल होत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापली, मुलचेरा आणि अहेरी तालुक्यातील नागरिकांना गडचिरोली आणि चंद्रपूर जाण्यासाठी अल्लापल्ली ते आष्टी हा एकमेव राष्ट्रीय मार्ग असून या महामार्गावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या महामार्गावरील खड्ड्यात पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. मागील एक वर्षापासून या महामार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी होत असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
या महामार्गावर नेहमीच रहदारी असते. मागील दोन वर्षापासून सुरजागड येथील लोह खदानीमुळे शेकडो वाहने दिवस-रात्र या महामार्गावर धावत आहेत.जड वाहनांनी या महामार्गाची वाट लावली आहे. खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत आहे.परिणामी साईड देण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला आणि मुख्य रस्त्यावरही वाहने अडकल्याने वारंवार वाहतुक ठप्प होत आहे. एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणारे असो किंव्हा खाजगी वाहनधारकांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे.
आज 6 ऑगस्ट रोजी या परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचला. शिवाय एटापल्ली तालुक्यातील सुरजागडचा कच्चा माल वाहतूक करणारे शेकडो वाहनांच्या गर्दीमुळे अहेरीकडे येणारी बस या ठिकाणी अडकली.बस एका बाजूने रस्त्याच्या कडेला फसल्याने प्रवाश्यांना बाहेर पडता आले नाही. परिणामी आपतकालीन मार्गाने प्रवाश्यांना बाहेर काढावे लागले.काही तास वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागली होती.त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाल्याचे दिसून आले. या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. मात्र,सध्या हा रस्ता जड वाहनांसाठीच नव्हे तर सर्वसाधारण वाहनासाठीही धोक्याचा ठरत आहे. अशा परिस्थितीतही सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.