गडचिरोली:- 6 ऑगस्ट रोजी शनिवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर नदी-नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली असून या रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जुलै महिन्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांना पूर परिस्थितीचा जबर फटका बसला होता. अहेरी उपविभागातील अहेरी, भामरागड आणि सिरोंचा या तीन तालुक्यामध्ये अतिवृष्टी निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले. काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने या भागातील पूर परिस्थिती ओसरली. मात्र,आज 6 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने आलापल्ली ते सिरोंचा या मार्गावरील अनेक नाल्यांना पूर आला आहे.
*पुलावर पाणी असताना जीवघेणा प्रवास*
दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मोसम ते गुड्डीगुडम दरम्यान असलेल्या नाल्यांना पूर आला आहे. पुलावर पाणी वाढत असतानाही काही दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक घरी जाण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात टाकून पुलावरील पाण्यातून प्रवास करताना दिसत आहेत.