चंद्रपूर :- चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या ७०० ते ८०० नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत असून एसडीआरएफची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या ७०० ते ८०० नागरिकांचे #स्थलांतरण करण्यात येत आहे. sdrf ची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करीत आहे.https://t.co/E42gcNBQs9
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 19, 2022
गडचिरोली जिल्ह्यात सद्याची परिस्थिती आटोक्यात आहे. परंतु आज सायं ४ वा. नंतर प्राणहिता नदी पात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून,पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात सद्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. मुल तालुक्यातील १२ लोक शेतात अडकले असून, त्यांचे बचाव कार्य सुरू आहे. तालुका चंद्रपूर, वरोरा व भद्रावती येथील ७०० ते ८०० नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. SDRF ची एक टीम स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
वर्धा जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १३६ मिमी एवढा सरासरी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट,समुद्रपुर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या बचावाकरिता एक एनडीआरएफ टीम व एक एसडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत ३९७ लोकांना १० निवारा केंदात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
कोंकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा दिनांक ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ०६ वा. पासून ते सायंकाळी ०७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी ०७. वा. ते ०६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात २ NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती
राज्यात पुरामुळे २८ जिल्हे व २८९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहे. आत्ता पर्यंत १२ हजार २३३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अति वृष्टीमुळे १०८ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत. पावसामुळे आतापर्यंत ४४ घरांचे पूर्णत: तर १३६८ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.
राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १९ तुकड्या तैनात
मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१,रायगड- महाड- २, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण -२,कोल्हापूर-२,सातारा-१, वर्धा -१ शा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत.तर नांदेड-१, गडचिरोली -१ ,वर्धा-१,चंद्रपूर-१,जळगाव-१ अशा एकूण सहा राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात येत आहे.