भद्रावती : मागील काही महिन्यात वाहतूक विभागाकडून चालविण्यात आलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत विशेष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वरोरा उपविभागातील 11वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना भद्रावती पोलीस ठाण्यात पार पडलेल्या एका सभेत प्रमाणपत्र तथा रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यात भद्रावती पोलीस ठाण्यातील 3 वरोरा पोलीस ठाण्यातील 6 तर माजरी पोलीस ठाण्यातील 2 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या हस्ते सदर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी, भद्रावतीचे ठाणेदार गोपाल भारती, वरोराचे ठाणेदार खोब्रागडे तथा माजरीचे ठाणेदार देवरे उपस्थित होते. सन्मानित करण्यात आलेल्या भद्रावती पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बेलेकर, पोलीस कॉन्स्टेबल विकी परचाके व तनुज टेकाम यांचा समावेश आहे. सदर मोहिमेंतर्गत वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करीत अपघात न घडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. या पोलीस विभागाला उल्लेखनीय यश प्राप्त झाले. या अभियानादरम्यान भद्रावती पोलीस ठाणे अंतर्गत 1100 वरोडा ठाणे अंतर्गत 1900 तर माजरी पोलीस ठाणे अंतर्गत 500 वाहतुकीच्या विविध केसेस करण्यात आल्या. यातून जवळपास 17 लक्ष रुपयाचा महसूल प्राप्त झाला.