चंद्रपूर :- अतिवृष्टी व संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्हयात नागरिकांच्या घरांचे, शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. ईरई धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन अविलंब नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देश माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्हयातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुरपरिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असुन काही महत्वाचे मार्ग बंद झाले आहे. त्यामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. अजुनही पाऊस सुरुच असल्यामुळे शेतीचे नुकसान व घरांची संख्या वाढू शकते. अशा परिस्थितीत पुरग्रस्त नागरिकांना तातडीने मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तो सुध्दा पुर्ववत करण्याची आवश्यकता आहे. पशुधन जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये औषध साठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींबाबत तातडीने कार्यवाही करुन नागरिकांना मदत देण्यात यावी असेही आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.