वरोरा (आशिष घुमे )दगडाला घाम फुटेल पण जिल्हा परिषदमधील अधिकाऱ्यांना नाही ही म्हण सर्वज्ञात आहे . तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यपदध्ती व कामाची गती कासवालाही लाजवेल अशी असल्याने पूर्वी एखाद्या ग्रामीण भागातील व्यक्तीला जिल्हापरिषदमध्ये जात असतांना कुठे जातंय असा प्रश्न विचारला की “झोलबा पाटलाच्या वाड्यात“ असेच उत्तर मिळायचे कधी गम्मत म्हणून तर कधी वर्षानुवर्षे न झालेले काम म्हणून हृदयातून ते सहज निघायचे . असो पण आजचा विषय जरा जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या कार्यप्रणालीवर संताप आणणारा आहे . वरोरा तालुक्यातील साखरा राजापूर येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली असून कौलारू घराप्रमाणे गळायला लागली आहे . हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे . जोपर्यंत नवीन इमारत बांधून मिळणार नाही तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठविणार नाही अशी भूमिका पालकांनी घेऊन तीन वर्षांपूर्वी पालकांनी शाळेला कुलूप ठोकले होते . या बाबतचे वृत्त प्रकाशित होताच तत्कालीन पंचायत समिती सभापती रोहिणी देवतळे यांनी भर पावसात शाळेला भेट देऊन पंचायत समितीचे अभियंता यांना पाच खोल्यांचा स्लॅप दुरुस्ती , संपूर्ण वर्ग खोल्यांना टाईल्स व रंगरंगोटीचे इस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले होते . या संपूर्ण कामाचे ७ लक्ष ५० हजार रुपयांचे इस्टिमेट मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते . विशेष म्हणजे तत्कालीन सभापती देवतळे यांनी आश्वासन दिल्यामुळे पालकांनी आंदोलन मागे घेतले होते. पण ३ वर्षाचा कालावधी लोटूनही प्रत्यक्ष कामाला सुरवात न झाल्याने ज्ञानार्जनासाठी बसावे कुठे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला असून १२ जुलैला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , सदस्य व गावकरी यांनी शाळेला भेट देऊन जुन्या इमारतीचे निरीक्षण केले . कोरोनामुळे मागील २ वर्षे शाळा बंद होत्या .या वर्ग खोल्या पावसाळ्यात वर्ग भरविण्याचा दृष्टीने धोकादायक असून प्रशासन या बाबीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली.
पंचायत समिती वरोरा मधील साखर राजापूर ही मुलाचे स्वछतागृह नसणारी एकमेव शाळा आहे हे विशेष . शाळेची इमारत मुलांना बसविण्या योग्य नसल्यामुळे शाळेच्या नवीन बांधलेल्या दोन वर्गखोल्यांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग बसविण्यात येतात . शाळेचा पट या वर्षी १२५ असल्यामुळे या दोन वर्गखोल्यांमध्ये बसविणे शक्य नाही .त्यामुळे शिक्षणाचा खेळ खंडोबा पावसाळा संपेपर्यंत किती दिवस सुरु राहील हे सांगता येत नाही . या वेळी प्रशासनाने शाळेची इमारत व मुलांचे स्वछतागृह याकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक पिरके यांनी दिला आहे . शाळा भेटी दरम्यान अध्यक्ष दीपक पिरके , सदस्य मनोज उमरे , किसान काळे , सुभाष निखाडे , विद्या मोहरे व गावकरी उपस्थित होते .