आलापल्ली येथे ढगफुटी सदृश्य ३२५ मिलीमीटर पावसाची नोंद
गडचिरोली: गडचिरोली जिल्हयात गेले दोन दिवसांपासून पर्जन्यमानाबाबत रेड अलर्ट देण्यात आला आहे. काल रात्रीपासून अहेरी तालुक्यातील आलापल्ली महसूल मंडळात 325 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली. रात्रीपासून नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. यात पोलीस, महसूल यंत्रणा यांनी सकाळी तात्काळ एसडीआरएफ टीमला घटना स्थळी बोलविले. यादरम्यान 25 नागरिकांना स्थानिक युवकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. जिल्हा प्रशासन, पोलीस व एसडीआरएफ टीमने बचावकार्य राबवून नागेपल्ली मधील १७ नागरिकांना बोटीने बाहेर काढले. यात एका नवजात चिमुकल्याचाही समावेश होता. तसेच इतर मार्गाने प्रशासनाने ४५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.
जिल्हयात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. पावसाचे पाणी संभाव्यरीत्या काही गावात शिरणार याचा अंदाज घेवून आतापर्यंत पावसापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. यामधे ११ गावांपैकी अहेरी तालुक्यातील सर्वच ११ गावांचा समावेश आहे. मात्र, नागेपल्लीतील अचानक झालेल्या अतिवृष्टीमूळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात घुसले व प्रशासनाकडून बचावकार्य मोहिम राबवावी लागली. जिल्हयात यावर्षी जुलैमधे जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. १ जून पासून आत्तापर्यंत एकूण सरासरीच्या १४६ टक्के पाऊस झाला आहे. 551 मिलीमीटर पाऊस गडचिरोली जिल्हयात आत्तापर्यंत पडलेला आहे. यात सर्वांत जास्त पाऊस अहेरी, भामरागड, सिरोंचा व एटापल्ली तालुक्यात झाला आहे.
अहेरीतील मुसळधार पावसामुळे दिना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे, बोरी आलापल्ली मुक्तापूर येथे रस्ता खचल्याने वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. वेलगूर येथील मामा तलाव काल पावसाच्या पाण्याने फुटला होता त्यानंतर प्रशासनाने दुरूस्ती केली मात्र पुन्हा आज तलाव फुटला यामध्ये कुठेही जीवीत हानी नाही.