गडचिरोली: बोगस बीटी कापूस बियाण्यांची साठवणूक करून लागवड व विक्री करणाऱ्या बंदुकपल्ली येथील अँटलू श्रीनिवास राव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्या पथकाने धाड टाकून महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंद असलेले कापूस बियाणे ६९ हजार ४०६ किमतीचे जप्त केले. या कारवाईमुळे बोगस बियाणे साठवणूक व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मुलचेरा तालुक्यातील बंदुकपल्ली गावात अँटलू श्रीनिवास राव या इसमाने बोगस व प्रतिबंधीत कापूस बियाण्यांची साठवणूक करून लागवड व विक्री करीत असल्याची गुप्त माहिती तालुका गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास पाटील यांना मिळाली होती. विकास पाटील यांनी आपल्या व पोलीस पथकासह राव याच्या घरावर धाड टाकली असता बोगस बीटी कापसाचे बियाणे विनापरवाना आढळून आले.
तालुका कृषी अधिकारी व पोलीस पथकाने राघवा या जातीचे ४५० ग्रॅम वजनाचे २८ पॉकीट, अरुणोदय जातीचे ४५० ग्रॅम वजनाचे ३ चॉफीट, ॲडवान्स ३३३ या जातीचे ४५० ग्रॅम वजनाचे १४ पॉकीट, काव्या जातीचे २ पॉकीट तसेच खुल्या बॅगमध्ये १६ किलो एवढे ६९ हजार ४०६ किमतीचे बोगस बियाणे जप्त केले. तालुका गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध मुलचेरा पोलीस ठाण्यात बियाणे नियम १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, महाराष्ट्र कापुस बियाणे कायदा २००९, पर्यावरण कायदा १९८६, भादंवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तालुका गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास पाटील, प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक भापकर, कृषी साहाय्यक कनिष्क वाघमारे, पोलीस शिपाई अभिजीत गावडे, पोलीस शिपाई रोशन पोहनकर यांनी केली. पाडली .