रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार
चंद्रपूर : रेल्वेचा प्रवास सुरक्षित असे म्हटले जाते. परंतु रेल्वेतील प्रवास सुरक्षित नाही याची प्रचिती नुकतीच आली.पूर्व चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना काल रेल्वेतील चोरीचा फटका बसला. ते पंचायतराजचा दौरा आटोपून पंढरपूरवरून मुंबईला परत येत असताना चोरट्यांनी आमदारांचे महागडे दोन फोन लंपास केले. मुंबईत पोहोचल्यावर जोरगेवारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आणि रेल्वेमंत्र्यांनाही पत्र लिहून तक्रार केली आहे.
आमदार जोरगेवार पंचायत राजच्या दोऱ्यावर सोलापूरला गेले होते. त्यांच्या दौऱ्यातील शेवटचे गांव पंढरपूर होते. तेथील काम आटोपून ते कुरुडवाडी स्टेशवरून सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये मुंबईसाठी बसले. रात्री झोपेची वेळ झाल्यानंतर त्यांनी फोन चार्जिंगला लावले आणि झोपी गेले. पहाटे जाग आली असता, दोन्ही फोन चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेच सहप्रवाशांच्या फोनवरून स्वतःचे नंबर डायल केले. तेव्हा दोन्ही मोबाईल फोन स्वीच ऑफ येत होते.
आमदार जोरगेवार प्रथम श्रेणी वातानुकूलित कोचमधून प्रवास करीत होते. प्रथम श्रेणी कोचमध्येही चोरी होऊ शकते, याची आपणास कल्पना नव्हती असे त्यांनी सांगितले. सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून तक्रारही केली. या घटनेने रेल्वेच्या एसी कोच सेवेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वेच्या प्रवासात आमदारही सुरक्षित नसतील, तर सामान्य प्रवाशांचे काय? असाही प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.