एका राजकीय पक्षाने थाटलेले जनसंपर्क कार्यालयही विकले
देसाईगंज
साकोली वडसा आरमोरी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी च्या अधिकाय्रांनी नगर परिषद देसाईगंज (वडसा) अंतर्गत महामार्गावरील बरेच अतिक्रमण धारक हे पोट भाडेकरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असुन सध्यास्थित असलेले पोट भाडेकरू मुळ अतिक्रमण धारकांला महिन्यापोटी पंधरा ते वीस हजार रुपये किराया अदा करित असल्याचे सांगितले जात आहे.
देसाईगंज शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी या महामार्गावर केलेल्या अतिक्रमित जागेवर या पोट भाडेकरूंनी पक्के व सुसज्ज बांधकाम करून या अनाधिकृत जागेवर आपला व्यवसाय थाटलेला आहे. काही मुळ अतिक्रमण धारकांनी काही पोट भाडेकरूंना पाच ते दहा लाख रुपयांत विकून परस्पर ताबा दिलेला असल्याचे सांगितले जात आहे. या पुर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने या ठिकाणचे अनाधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली होती. त्या वेळी या अतिक्रमण धारकांवर कारवाई न करण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या कथित पदाधिकाय्रानी पुढाकार घेतला होता. कालांतराने या मोबदल्यात या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पक्ष जनसंपर्क कार्यालयच या राष्ट्रीय महामार्गावर थाटले होते. नंतर हा कार्यालयच दुसऱ्याला मोठी रक्कम घेऊन परस्पर विकून टाकले .
तत्पुर्वि, देसाईगंज येथील एका प्रसिद्ध कापड व्यावसायिकांने त्याच्या दुकानासमोर काही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केल्याने अक्षरशः वैतागून देसाईगंज येथील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण धारकांवर कारवाई न करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरचे अधिकारी मोठी रक्कम घेऊन अभयदान देत असून त्यामूळे कारवाई करित नसल्याबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग नागपुर यांच्याकडे लेखी तक्रार करून गंभीर आरोप लावलेला होता. या तक्रारीची तातडीने गंभीर दखल घेऊन ता २४ एप्रिल २०१६ ला देसाईगंज शहरात राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थाई पट्टेधारकांसह लहान मोठे अतिक्रमण धारकांना अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत सुचनेतील राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण ( भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ चचा नियम २६ ची उपकलम (२) च्या अधीन राहून सहायक अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी नोटीस बजावली होती.
मात्र, त्यावेळी काही लोकप्रतिनिधी यांनी मध्यस्थी करुन राष्ट्रीय महामार्गावरचे काम जेंव्हा सुरू होईल त्यावेळी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढु असे आश्वासन मिळाले होते, त्यामुळे त्या वेळी अतिक्रमण हटाव मोहिम तुर्तास टळली होती. मात्र परत आता २० मे २०२२ ला राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अतिक्रमण धारकांना दुस-यांदा नोटीस बजावण्यात आली आहे. याचा अर्थ प्रत्यक्ष विकास कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. गडचिरोली शहरातील अतिक्रमण देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता आताच काढले असून याच पार्श्वभूमीवर मागील काही वर्षांपासून देसाईगंज शहरातील वाहतूकीच्या वाढत्या वर्दळीतुन झालेल्या भिषण अपघातामुळे झालेली जीवितहानी लक्षात घेऊन शहरातील अतिक्रमण हटविणे आता अगत्याचे झाले आहे.