गडचिरोली:-जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील मवेली या अतिदुर्गम गावात काल 15 मे रोजी रात्रीच्या सुमारास रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली.
एटापल्ली तालुक्यात (LWE) योजनेअंतर्गत मवेली ते मोहूर्ली रस्त्याचे काम सुरू होते.मवेली या गावात रस्ता कामावरील वाहने ठेवली होती.काल रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी ही वाहने जाळल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली.सदर काम हे वल्लभाणी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे काम असल्याची माहिती समोर येत आहे.
जाळपोळ करण्यात आलेल्या वाहनांमध्ये 2 पोक्लीन,1 ट्रक,1 ग्रेडरचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.नक्षली रस्ता कामावरील वाहनांना लक्ष केले असून जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षल्यांनी डोकं वर काढल्याचे दिसून येत आहे.
दोन दिवसापूर्वी नक्षल्यांनी केली होती इसमाची हत्या
एटापल्ली तालुक्यातील रामजी तिम्मा वय (40) या इसमाची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून 14 मे रोजी नक्षलयांनी हत्या केली होती.सदर इसम याच तालुक्यातील हालेवारा पोलीस मदत केंद्र अंतर्गत समाविष्ट मेंढरी या गावातील रहिवासी होता.त्यावेळी नक्षल्यांनी त्याच्या मृतदेहाजवळ पत्रके पण टाकली होती.
आज उघडकीस आलेली जाळपोळीची घटना सुद्धा हालेवारा पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या मवेली येथील असल्याने या परिसरात सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.