घुग्घुस प्रतिनिधी/ १३ मे रोजी सकाळी चंद्रपूर तालुक्यातील साखरवाही येथील शेतपरिसरात स्थानिक शेतकरीबांधवांच्या रास्त मागण्या घेवून भाजपतर्फे रेल्वे प्रशासनाविरोधात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले.
साखरवाहीजवळील विमला सायडींग परिसरातील शेतकर्यांना आपल्या शेतात जाण्या-येण्यासाठी पर्यायी एकचं रस्ता उपलब्ध होता, परंतु तो रस्ता मागील महिन्यात झालेल्या ट्रॅक्टर अपघातामुळे रेल्वेने बंद केला. त्यामुळे तो रस्ता तात्काळ सुरू करावा. या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे फाटक उभारून तेथे एका कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. तसेच याठिकाणी कायमची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने विमला सायडींगजवळ आणि मुरसा शिव धुऱ्याजवळ असे दोन अंडरपास निर्माण करण्यात यावे. यासोबतच अपघाताने क्षतिग्रस्त झालेल्या ट्रॅक्टरच्या मालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी. अशा महत्त्वपूर्ण मागण्यांना घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले.
सकाळीच सुरू झालेल्या या आंदोलनास रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला विरोध दर्शविला. परंतू शेतकर्यांनी विशेषतः महिलाभगिनींनी आक्रमक पवित्रा घेतल्याने रेल्वे प्रशासनाला नरमाईची भूमिका घेऊन सहकार्य करावे लागले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचेशी चर्चा करून आंदोलनाच्या मागण्यांसंदर्भात अनुकुलता दाखवत रेल्वे प्रशासनाने तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने बंद केलेला शेतमार्ग पूर्ववत केला. तसेच येत्या काही दिवसांत सक्षम अधिकार्यांशी बैठक घेऊन सदरहू अंडरपासच्या कामासंदर्भात उचित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासनही त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी रेल्वे विभागाचे नागदेवते, आरपीएफचे कृष्णा रॉय, वासनिक, पाटील, मांजी यांसह अन्य रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, की या ताडाळी ते घुग्गुस रेल्वे मार्गाला लागूनचं साखरवाही परिसरातील शेत्या असल्याने रेल्वे मार्गावरून शेतकऱ्यांना ये-जा करण्याकरिता अंडरपास (बोगदा) किंवा रेल्वे फाटक करून देण्यासंदर्भात महामंत्री नामदेव डाहूले यांनी गेल्या दोन वर्षांपासून पत्रव्यवहार केला. परंतू रेल्वे प्रशासनाने याकडे वारंवार दुर्लक्ष केले. त्यामुळे गेल्या ११ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा विषय लावून धरल्या गेला. यावेळी रेल्वेने स्पष्ट भूमिका न कळविल्याने आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे आंदोलन पार पडले.
पुढे बोलताना, याआधी जाण्यायेण्यासाठी याठिकाणी रस्ता होता, परंतु एक महिन्यापूर्वी येथून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला रेल्वेने धडक दिल्याने त्या ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. त्यावर कुठलीही उपाययोजना न करता रेल्वेने त्या ट्रॅक्टर मालकालाचं नोटीस पाठविली आणि पलिकडे जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद केला. रेल्वे फाटकाच्या दुसऱ्या बाजूने हजार ते दिड हजार एकर शेती असल्याने शेतकऱ्यांना पलीकडे शेतशिवारात जाण्यासाठी या शेतमार्गाशिवाय पर्याय नाही. करिता हा रेल्वेमार्ग ओलांडून जाणे भाग आहे. अशा वेळेला मागील दोन वर्षापासून मागणी करूनही याठिकाणी ना फाटक बसविले ना अंडरपास बांधला. आणि आता ऐण मान्सूनच्या तोंडावर शेतीकडे जाणारा रस्ता रेल्वेने बंद केल्याने शेतकऱ्यांनी हा पवित्रा घेतला. आजच्या या आंदोलनामुळे शेतरस्त्याचे काम जेसीबीने पुर्ण करण्यात आले. तसेच येत्या काही दिवसांत अंडरपासचेही काम सूरू करण्याचे लेखी आश्वासन रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यावर आम्ही आंदोलनाची सांगता करत आहोत. असेही ते म्हणाले.
या आंदोलनाला, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, कामगार आघाडीचे प्रदेश महामंत्री अजय दुबे, माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, रूषी कोवे, विनोद खेवले, भारत रोहणे, माजी जि. प. सदस्य सुरेखा पाटील, रंजित सोयाम, महिला आघाडीच्या प्रिया ढवस, दुर्गा बावणे, . अनु ठेंगणे, संगीता डाहुले, ढुमणे, विनोद ढापणे, भाऊराव चार्लेकर, भाऊराव कुळमेथे, रामभाऊ कडुकर, बंडू ऊरकूडे, शुद्धोधन वानखेडे, मुबारक शेख, भीमराज आईलवार, युसुफ शेख, योगेश कडुकर, अजय चार्लेकर, सुशांत शर्मा, आशिष वाढई, राकेश बोमनवार, अमित निरंजने, पवन शेरकी, सुजय निर्मल, पियूष मेश्राम, आदिंसह मोठ्या संख्येने साखरवाही ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते