चंद्रपूर :- येथील माता महाकाली मंदीर देवस्थान सौंदर्यीकरण व परिसराच्या विकासाच्या प्रस्तावाचा भारतीय पुरातत्व विभागाने पुन:श्च विचार करावा. तसेच राजुरा परिसरातील पुरातन सिद्धेश्वर मंदीर व किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी सविस्तर अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव सादर करावा असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
मंत्रालयात चंद्रपूर येथील माता महाकाली मंदीर देवस्थान सौंदर्यीकरण व विकास कामाबाबत तसेच राजुरा निर्वाचन क्षेत्रातील पुरातन सिद्धेश्वर मंदीर, माणिकगड किल्ला यांचे जतन व दुरूस्ती करणेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव श्री.थोरात, पुरातत्व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस बर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव वाय.बी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्री कुंभे आदीसह अधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले, महाकाली मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या प्रस्तावासंदर्भात पुरातत्व विभागाने कार्यवाही करावी. यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. सिद्धेश्वर मंदिर व माणिकगड किल्ला यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी संचालकांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनास सादर करावा असेही मंत्री देशमुख यांनी सांगितले.