logo

HOME   महाराष्ट्र

डॉ.आंबेडकर आणि स्वर्गीय विलासरावांपेक्षाही माहिती व जनसंपर्कचे अधिकारी मोठे झाले का? - आमदार हेमंत टकले

चुकीची जबाबदारी घेवून मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी : पत्रकारांना योजनांचा सरसकट फायदा दया

डॉ.आंबेडकर आणि स्वर्गीय विलासरावांपेक्षाही माहिती व जनसंपर्कचे अधिकारी मोठे झाले का? - आमदार हेमंत टकले .

नागपूर : राज्यसरकारच्या इंग्रजी लोकराज्य अंकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या जागी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा फोटो प्रसिध्द करणाऱ्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन करणाऱ्या माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि याप्रकरणी चुकीची जबाबदारी घेवून मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले यांनी केली. ते पुरवण्या मागण्यांवर बोलत होते.
 
ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना राबविण्यासाठी सरकारने केलेली १५ कोटींची तरतुद अपुरी आहे असेही आमदार हेमंत टकले म्हणाले.
 
या योजनेसाठी तरतुद करताना ही योजना नेमकी काय आहे हे सरकारने स्पष्ट केलेलं नाही. शेतकरी सन्मान योजनेसारखी या पत्रकार सन्मान योजनेची अवस्था होवू नये अशी अपेक्षा आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.
 
ही योजना केवळ मंत्रालय कव्हर करणाऱ्या किंवा अधिस्विकृतीधारक पत्रकारांसाठी आहे की, गावखेडयात स्ट्रिंजर म्हणून बातमीदारी करणाऱ्या पत्रकारांसाठीही हे देखील सरकारने स्पष्ट करावे. सरकारने शेतकरी सन्मान योजना लागू करताना अनेक अटी टाकल्या होत्या. आजकाल सरकारची सन्मान योजना म्हटली की, भीक नको पण कुत्रं आवर अशी स्थिती असते अशी खरमरीत टिकाही आमदार हेमंत टकले यांनी केली.
 
पत्रकार सन्मान योजना ही सरसकट सर्व पत्रकार बांधवांसाठी लागू करण्यात यावी. अटींचा डोंगर उभा करुन या योजनेची अवस्था शेतकरी सन्मान योजनेसारखी होवू नये असा टोलाही आमदार हेमंत टकले यांनी लगावला.
 
यासह अनेक समस्यांचा मागोवा आमदार हेमंत टकले यांनी घेत पत्रकारांची सक्षम बाजु सरकारसमोर मांडली.
 
आंबेडकरांच्या फोटोबाबत बोलताना त्यांनी माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. इथं खाजगी वाहिन्या मिनिटामिनिटाला, दैनिके दिवसाला बातम्या छापत असतात. ते चुकत नाहीत परंतु मासिकाच्या निर्मितीला महिनाभर वेळ घेवूनही आणि डझनभर अधिकारी घेवून इतकी गंभीर चुक झाली आणि ती होवूनही एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा आणि स्वर्गीय विलासरावांपेक्षाही माहिती व जनसंपर्कचे अधिकारी मोठे झाले आहेत का ? नियुक्तीला अपात्र म्हणून मॅटने बडतर्फ केलेला अधिकारी या पदावर का नेमण्यात आला. या गंभीर चुकीची जबाबदारी माहिती विभाग, खाजगी प्रकाशकावर टाकून जबाबदारी झटकत असेल तर हा विभाग बंद करुन टाका अशी मागणीही आमदार हेमंत टकले यांनी केली.
 


Top