logo

HOME   महाराष्ट्र

शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी शासन कटिबद्ध -ना. सुधीर मुनगंटीवार

कारंजा पं.स. व ट्रामाकेअर इमारतीचे लोकार्पण

शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी शासन कटिबद्ध  -ना. सुधीर मुनगंटीवार
वर्धा :- शेतक-यांच्या दुख:,वेदना दुर करण्यासाठी शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. कृषि पंपाचे विज कनेक्शन, सिंचन सुविधा, नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांना मदत आणि शेतकरी कर्ज माफी करण्यासोबतच शासनाने आता शेतक-यांचे प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा छोटया प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील पंचायत समितीच्या नवनिर्मित प्रशासकिय इमारतीच्या तसेच ट्रामा केअरचे लोकार्पण सोहळयाप्रसंगी सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार अमर काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, जिल्हा परिषद सभापती निता गजाम, गटविकास अधिकारी उमेश नंदागवळी, माजी आमदार दादाराव केचे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

या प्रशासकिय इमारतीसाठी 3 कोटी 21 लाख रुपये तर ट्रामा केअरसाठी 3 कोटी 77 लाख रुपये खर्च करुन वास्तु बांधण्यात आल्या आहेत. या वास्तुंचे लोकार्पण करतांना ते म्हणाले, ही वास्तु निर्जिव होता कामा नये, गावाच्या उत्थानासाठी मदतगार ठरणारे कार्य मंदिर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्य मार्ग ते पंचायत समिती इमारतीपर्यंतच्या रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 30 लाख रुपये आणि इमारतीमधील फर्नीचरसाठी 50 लक्ष रुपये मंजुर करण्यात येईल, अशी हमी त्यांनी यावेळी दिली.

सन 2000 मध्ये पहिल्यांदा 68 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. तेव्हाच नियोजनपुर्वक शेतक-यांच्या गरजा ओळखून धोरणात्मक निर्णय घेतले असते तर शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला नसता या शासनाने शेतक-यांची महत्वाची गरज म्हणजे सिंचनावर भर दिला. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाडयातील पाच – सहा वर्षापासुन प्रलंबित असलेले कृषि विज पंपाची विज जोडणी देण्यावर भर दिला. आता केवळ चालू वर्षाची विज जोडणी प्रलंबित असून त्यासाठी सुध्दा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

मुबंई- पुणे कडे जाणारा निधी आता समृध्दी महामार्गाव्दारे विदर्भाकडे येईल. हा निधी गरजु लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो कि नाही यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारंजा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रश्न मुबंईला बैठक लावून सोडविण्यात येईल. तसेच कारागिरांसाठी विद्यापीठ तयार करण्याचा विचार असून यामुळे येथे येणा-या उद्योगासाठी कौशल्य पूर्ण युवक तयार होतील. त्याचबरोबर प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून नव उद्योजकांना उभे राहण्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. आज नोकरी मागणा-यांपेक्षा नोकरी देणारे तयार करण्याची गरज आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी आमदार अमर काळे यांनी ट्रामा केअर युनिटसाठी कर्मचारी व डॉक्टर लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. बोंडअळी , गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना पॅकेज दयावे, एमआयडीसी जमिन खरेदीसाठी शासनाने परवाणगी दयावी, आदिवासी भागातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी 220 केंव्हीचे उपकेंद्र मंजूर करावे आदी मागण्या केल्यात. यावेळी माजी आमदार दादाराव केचे, सभापती मंगेश खवशी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत तीन बचत गटांना कर्ज मंजुरीचे पत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.


Top