logo

HOME   महाराष्ट्र

संतांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी -वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

भागापूर येथील श्री संत खप्ती महाराज संस्थानाच्या भक्त निवासाचे भूमिपूजन

 संतांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी -वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार अमरावती:- संतांनी आपले साहित्य व कृतीतून अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडला. समाजात विविध प्रकारची कामे करताना संतविचारांतून सतत प्रेरणा मिळत असते, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील तीर्थक्षेत्र भागापूर येथील श्री संत खप्ती महाराज संस्थानाच्या प्रस्तावित शांतीकुंज भक्तनिवासाचे भूमिपूजन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील, आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार अरुण अडसड, संस्थानचे अध्यक्ष निरंजन महाराज चौधरी, सरपंच विवेक चौधरी, जयंत मामीडवार, श्री. खोडे महाराज, हरीओम जैस्वाल, अशोक चौधरी, अरुण वडतकर, मार्तंडराव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, संतांचा विचार म्हणजे माणुसकीचा विचार होय. माणूस म्हणून वागण्याची जबाबदारी संतांनी समाजाला शिकवली. त्यामुळे विविध विद्यापीठांना संतांची नावे असावीत, असा आग्रह मी सुरुवातीपासून धरत आलो आहे. संस्थानतर्फे 80 वर्षांपासून गौरक्षणाचे पवित्र काम होत आहे. कृषीसंस्कृतीतील गाईंचे महत्व, सेंद्रिय शेतीची गरज ओळखून शासनानेही त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अनेकविध उपक्रम हाती घेतले आहेत.
संस्थानच्या भक्तनिवासासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, त्याचप्रमाणे, येथे रेल्वे स्थानक सुरु करण्याबाबत आणि नवीन रस्ता देण्याच्या मागणीबाबत आवश्यक तरतूदी तपासून निश्चितपणे कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
प्रारंभी सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, प्रवीण पोटे- पाटील व विविध मान्यवरांनी श्री संत खप्ती महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर आरती करण्यात आली. संस्थानच्या गौरक्षण संस्थानचीही पाहणी मान्यवरांनी केली. जयंत मामीडवार यांनीही मनोगत व्यक्त केले. जयेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. विवेक चौधरी यांनी आभार मानले.


Top