logo

HOME   लक्ष्यवेधी

विधानसभा इच्छुकांच्या गाठीभेटी वाढल्या

नवनवीन चेहरे : कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रमांत उपस्थिती

विधानसभा इच्छुकांच्या  गाठीभेटी वाढल्या

भद्रावती (विशेष प्रतिनिधी ) :-पुढाऱ्यांच्या गावात  व सार्वजनिक कार्यक्रमात येरझारा वाढल्या की निवडणुका येणार हे निश्चित मानले जाते. आता सर्वसामान्य नागरिकांनाही पुढाऱ्यांच्या बदललेल्या वर्तणुकीचा परिपूर्ण अभ्यास झाला आहे. भद्रावती- वरोरा विधानसभेत इच्छुकांची भाऊगर्दी आहे. प्रत्येकजणच जनसंपर्क दांडगा असल्याचे दाखविण्यासाठी कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावताना दिसत आहे.                "दर पाच वर्षांनी होतो लिलाव" या उक्तीप्रमाणे पांढऱ्या कपड्यातील पुढारी आता मतदारांच्या घरांकडे घिरट्या घालताना दिसत आहे. नेत्यांकडून आता कोणतीही संधी सोडली जात नाही. वाढदिवस  अंत्यविधी, लग्नसमारंभ, सोयरीकी इतकेच काय तर छोट्या-मोठ्या सणावारांच्या व जयंती तथा स्मृतिदिनांच्या शुभेच्छाही फ्लॅक्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आवर्जून दिल्या जात आहे. मागील चार वर्षाच्या काळात ज्यांना जनतेशी काहीही देणंघेणं नव्हतं तेही आता अगदी गल्लीबोळातील प्रश्नावरही पोटतिडकीने बोलताना दिसत आहे. एखाद्या तुंबलेल्या नालीची समस्याही राष्ट्रीय स्थळाची असल्याचा भास या पुढाऱ्यांकडून निर्माण केला जात आहे.             सत्ताधारी व विरोधकांचे  निवडणुकीच्या तोंडावर बदललेले रूप पाहून सामान्य नागरिकही आपला संताप काढण्याच्या तयारीत दिसत आहे. चुकून एखादा पुढारी हाती गवसला की त्याच्यावर नागरिकांकडून लगेच प्रश्नांची सरबत्ती केली जाते. तुम्ही आतापर्यंत कोठे होता? तुम्हाला आत्ताच वेळ मिळाला का? या शब्दात सुरुवात होते. या मंडळींनाही धरले तर चावते आणि सोडले तर पळते या म्हणीप्रमाणे नागरिकांचे निमूटपणे ऐकल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.   पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार हे चित्र जरी आज स्पष्ट झालेले नसलेतरी आपलीच उमेदवारी पक्की असे भासवीत इच्छुकांचा प्रचार सुरू झाला आहे. युती होते की नाही, आघाडीतील नेमका उमेदवार कोण असले कोडे भद्रावती-वरोरा विधानसभेत आहे. त्यामुळे अनेकजण सावध पवित्रा घेत असून चित्र स्पष्ट झाल्यावर आपले पत्ते उघड करणार आहे. या निमित्ताने मात्र सामान्यांना पुढाऱ्यांकडे असलेला पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशेब चुकता करण्याची संधी आली आहे. यातूनच अनेक मजेदार किस्से ऐकायला येत आहे.उंची कमी असलेली माणसे आपली फेस व्हॅल्यू वाढविण्यासाठी छोट्या छोट्या इव्हेंटचे  मोठे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर होत आहे. काहीजण डझनभर फळ  वाटपाचा कार्यक्रम ही महाशब्द लावून सामाजिक कार्यक्रम घेतल्याचे भासवायचा  उपक्रम करीत आहे. श्रावण महिन्याचे निमित्त साधून आता तर जेवणावळींनाही सुरुवात झालेली असून ठिकठिकाणी खमंग भोजनाचा आस्वाद सुरू झालेला आहे. या संधीचा लाभ घेत अनेक खवय्ये  गणेशजी विराजमान असूनही मिष्टान्नासह मांसाहाराचा आस्वाद घेत आहेत.Top