logo

HOME   ताज्या बातम्या

जहाल नक्षलवादी दाम्पत्यास अटक,गडचिरोली जिल्हा पोलिस दलाची कारवाई

नर्मदाक्का व किरण ला ठोकल्या बेड्या

जहाल नक्षलवादी दाम्पत्यास अटक,गडचिरोली जिल्हा पोलिस दलाची कारवाई

 गडचिरोली:- जिल्ह्यातील नक्षल चळवळीची प्रमुख, दंडकारण्य स्पेशल झोनल समितीची सदस्य व जहाल नक्षली नर्मदाक्का हिला तिचा पती किरणकुमार याच्यासह गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
  आज पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गडचिरोली पोलिस मागील अनेक दिवसांपासून नर्मदाक्का व किरणकुमार यांचा शोध घेत होते. दोघेही तेलंगणा राज्यातून सिरोंचामार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी तेलंगणा पोलिसांच्या सहकार्याने नर्मदाक्का व किरणकुमार यांना सोमवारी(ता.१०)संध्याकाळी सिरोंचा बसस्थानकावरुन अटक केली.
  उप्पुगुंटी निर्मलाकुमार उर्फ नर्मदाक्का उर्फ नर्मदा दिदी(५८) ही आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गलावरम मंडळमधील कोडापावनुरु येथील रहिवासी असून, तिचा पती राणी सत्यनारायणा उर्फ किरण उर्फ किरणदादा(७०) हा ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील राजानगरम मंडळमधील नरेंद्रपुरम येथील रहिवासी आहे.
   दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य असलेली नर्मदाक्का ही डीकेएएमएसची इन्चार्ज होती. एके-४७ हे शस्त्र वापरणारी नर्मदाक्का हिच्याच नेतृत्वात जिल्ह्यातील बहुतांश नक्षली आजवर काम करीत होते. येथे आजवर झालेल्या अनेक जाळपोळी व हत्यांची मास्टर माईंड नर्मदाक्का हीच होती. २००९ मध्ये हत्तीगोटा चकमक, २०१० मधील लाहेरी येथील चकमक, २०१६ मध्ये सुरजागड पहाडावर झालेली ८० वाहनांची जाळपोळ, जोगनगुडा येथील दोन शिक्षकांच्या हत्या अशा अनेक गुन्ह्यांत तिचा सहभाग होता. तिच्यावर जिल्ह्यात ६५ गुन्हे दाखल होते. राज्य शासनाने तिच्यावर सुमारे २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
    नर्मदाक्का चळवळीत आल्यानंतर किरणकुमार याच्याशी तिचा विवाह झाला. परंतु दोघांची भेट फारच कमी व्हायची. किरणकुमार हादेखील दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य होता. तसेच दंडकारण्य पब्लिकेशन टीमचा इन्चार्ज होता. नक्षल्यांच्या 'प्रभात' या मासिकाचाही तो संपादक होता. तो ९ एमएम पिस्टल हे शस्त्र वापरायचा. त्याच्यावरही महाराष्ट्र शासनाचे २५ लाखांचे बक्षीस होते.
   १ मे २०१९ रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात १५ पोलिस व एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते. या घटनेची जबाबदारी नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोने स्वीकारला होती. या ब्युरोची प्रमुख असल्याने नर्मदाक्का तिचा पती किरणकुमार यांच्यावर जांभुळखेडा भुसुरुंगस्फोटाच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.या घटनेमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असून, आदिवासींनी स्वत: पुढे येऊन नक्षल्यांना गावबंदी करावी, असे आवाहन श्री.बलकवडे यांनी केले. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित व हरी बालाजी उपस्थित होते.


Top