logo

HOME   साहित्य

पतंगराव, आपली भेट कधी ? - दीपक चटप

पतंगराव, आपली भेट कधी ? - दीपक चटप

बहुधा 2017 चा जुलै महिना असावा, विधिमंडळातील इंटेर्नशीपचे कामकाज संपवून मी संध्याकाळी मरीन ड्राइव्ह ला जाऊन बसलो होतो. समुद्राकडे चेहरा आणि एयर इंडिया इमारती कडे पाठ होती. सहज मागे लक्ष गेलं तर पतंगराव चालत चाललेले, बाजूला बॉडी गार्ड, स्वीय सहाय्यक असे लोक होतेच. मी त्यांच्याकडे पाहिलं होतं आणि मी त्यांच्याकडे पाहतोय हे त्यांनीही पाहिलं होतं. मी पुन्हा समुद्राकडे पाहू लागलो,पण क्षणात मनात विचार आला की त्यांनी आपल्याकडे ओळखीच्या नजरेनं पाहिलंय आपण असं बसून राहणं योग्य नाही. मी लगेच उतरून त्यांच्या दिशेने चालायला लागलो, त्यांना कळलं की कोणीतरी आपल्या दिशेने चालत येतं आहे, ते आहे त्या जागीच थांबले आणि मी जवळ यायची वाट पाहू लागले. मी जवळ जाऊन त्यांच्याशी बोलायला लागलो, स्वतःची ओळख करून दिली. माझी भरपूर विचारपूस केली, 'पुण्याला मला भेटायला ये' असं सांगितलं. लगेच त्यांचे पीए सचिनजींकडे बघून म्हणाले , 'यांनी वेळ मागितली की लगेच त्यांना भेटीची वेळ द्यायची'. 'बंगल्यावर ये' असं सांगून, 'येतो' असं म्हणून आपल्या दुडक्या चालीत चालू लागले.
त्यानंतर बराच वेळ निघून गेला, मध्यंतरी नागपूर अधिवेशनात भेट झाली तेव्हाही 'पुण्याला भेटायला ये' असं म्हणाले.पतंगरावांना भेटायला जायचं, जायचं अनेकदा माझ्या डोक्यात होतं. अगदी मी माझ्या डायरीत ' To call Pantangrao's PA ' असंही अनेकदा लिहिलं होतं, मात्र काही कारणाने ते राहून गेलं.
पतंगरावांच कौतुक कायम वाटत राहायचं मला, एका सामान्य घरातील मुलगा पुण्यासारख्या शहरात येऊन इतकं मोठं विद्यापीठ उभं करू पाहतो, किंबहुना करतोही..! आज एक खोली बांधायची म्हणालं की नाकी नऊ येणारी लोकं आपण पाहतो अनेकदा. पण पतंगरावांनी तर एख्ख विश्वविद्यापीठंच उभं केलं. त्याचा त्यांना माज नव्हता, पण स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान मात्र नक्कीच
एक शिक्षक, सिनेट सदस्य,एस.टी महामंडळ सदस्य आणि म अध्यक्ष, आमदार, मंत्री, भारती विद्यापीठाचे कुलपती अशा पायऱ्या ते चढत गेले. सारं कुटुंब त्यांनी कायम एक ठेवलं हे विशेष ! भल्या भल्या राजकीय नेत्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या राजकीय महत्वकांक्षांना वेसण घालणं अवघड जातं, पण पतंगरावांना तेही जमलं.
नामदेव ढसाळ गेल्यावर त्यांची सर्व पुस्तके घेऊन पतंगरावांनी त्यांचं एक सुंदर संग्रहालय भारती विद्यापीठात उभं केलं.अनेकांना त्यांनी मनापासून आणि मुक्त हाताने मदत केली, अनेकांची आयुष्य- संसार उभी केले. हे खरं कर्तृत्व. जग बदलण्याच्या बाता मारणारे अनेक लोक असतातच की !
काल पतंगराव गेल्याची बातमी कळली तेव्हा मी मरीन ड्राइव्हलाच होतो, फार वाईट वाटलं.
शरद पवार साहेबांच्या अभिनंदन ठरावावर विधानसभेत पतंगरावांचं संपूर्ण भाषण मी ऐकलं होतं. अगदी मनापासून बोलत होते, 'मला शरद पवारांनी तिकीट दिलं,म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो' असं विधानसभेत कृतज्ञतेने म्हणाले होते. एवढं मोठं होऊनही आपल्याला पहिल्यांदा मदत करणाऱ्या व्यक्तीविषयी त्यांना कृतज्ञ राहावंसं वाटलं हे विशेष.
एवढ्या मोठया माणसाशी एक सविस्तर भेट राहिली याची खंत माझ्या मनात कायम राहील.अशा या कर्तृत्ववान नेत्याला माझी मनापासून आदरांजली..
-
दीपक चटप


Top