logo

HOME   मुख्य बातमी

पुरग्रस्त गडचिरोलीसाठी महाराष्ट्र एकवटेल का ?

भामरागडमधील आदिवासी बांधवांचा टाहो

पुरग्रस्त गडचिरोलीसाठी महाराष्ट्र एकवटेल का ?

कोल्हापुर , सांगली जिल्ह्यातील पुराप्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड व अहेरी तालुक्यातील १०० हुन अधिक गावांना पुराचा फटका बसला आहे. भौतिक विकासापासून दूर असलेल्या भागात पुरामुळे काही लोकांचे जीव देखील दगावलेत. आजाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पूरग्रस्त भागातील आदिवासींची परिस्थिती बिकट असताना शासन व प्रशासन मात्र ढिम्म आहे. कुठल्याही प्रकारची मदत अद्याप पूरग्रस्तांपर्यंत पोहचली नसून पूरग्रस्त गडचिरोलीसाठी महाराष्ट्र एकवटेल का ? असा टाहो भामरागड व अहेरी तालुक्यातील पूरग्रस्त आदिवासी बांधव व्यक्त करत आहे.    सद्या या भागात पुरामुळे मोठी वाताहात झाली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चंद्रपूर येथील अ‍ॅड. दीपक चटप व गडचिरोली येथील बोधी रामटेके यांनी 'हेल्पिंग हँड्स फॉर गडचिरोली फ्लड्स व्हीक्टीम्स' हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाविषयी सांगताना अ‍ॅड. दीपक चटप म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे जनजीवन पुरामुळे विस्कळीत झाले. गरोदर महिलांचे प्रचंड हाल होताना दिसतात. ज्याप्रमाणात सांगली व कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचे हात सरसावले त्याप्रमाणात गडचिरोलीसाठी आपण एकत्र आले पाहिजे. या उपक्रमामुळे ५०० हुन अधिक कपडे, जीवनावश्यक वस्तू आमच्याकडे जमा झाले असून आम्ही लवकरच भामरागड व अहेरी येथे जाऊन पूरग्रस्तांना ही मदत देणार आहोत. ही तात्पुर्ती मदत असली तरी तेथील पुराची समस्या सोडवण्यासाठी पर्लकोटा नदीच्या पुलाची उंची वाढवली पाहिजे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा व न्यायालयीन लढा लढू असे सांगितले. तर, 'हेल्पिंग हँड्स फॉर गडचिरोली फ्लड्स व्हीक्टीम्स'द्वारे जमा झालेली मदत पुरेशी नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या बांधवांना मदत करावी, असे बोधी रामटेके म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात ब्लॅंकेट, कपडे, गरोदर स्त्रियांचा पोषण आहार, मेडिसिन, रजिस्टर इत्यादी जीवनावश्यक गोष्टींची गरज निर्माण झाली आहे. नक्षलवादाच्या प्रभावामुळे या भागात रस्ते व पूल बांधता येत नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर, या भागातील खाणीच्या ठेकेदारांना नक्षलींचा विरोध असूनही सरकार बंदोबस्त देतात. तशाचं बंदोबस्तात पुलाचे काम का पूर्ण केल्या जात नाही..? असा  सवाल नागरिक विचारत आहे.तूर्तास गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी शासनाने त्वरित पाऊले उचलुन दिलासा देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर 'हेल्पिंग हँड्स फॉर गडचिरोली फ्लड्स व्हीक्टीम्स' सारखे उपक्रम ठिकठिकाणी आयोजीत झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मोठी मदत होईल. Related Video


Top